Breaking News
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आणि वारसा अत्यंत प्रामाणिकपणे पुढे चालवणाऱ्या शिवप्रेमींना त्याचप्रमाणे शिवरायांच्या सहकारी असलेल्या मावळ्यांच्या वंशजांना मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसृष्टीच्या वतीने दरवर्षी शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा असून यावर्षीचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी सरदार हिरोजी इंदलकर यांचे तेरावे वंशज श्री संतोष सुभाष इंदलकर यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर संपूर्ण महाराष्ट्रभर करणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवचरित्रकार हभप श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना शिवस्वराज्यभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक प्रा.सहदेव मोरे पाटील व डॉ. कल्याण मोरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोरे हॉस्पिटल मार्केट यार्ड मंठा या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याचे देखील मोरे परिवाराच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग उभारणी करणाऱ्या निवडक उद्योजकांचा देखील सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.मागील वर्षापासून मोरे पाटील परिवार व शिवसृष्टीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम कुठलीही वर्गणी जमा न करता स्वखर्चाने केला जातो. १२ वर्ष म्हणजे एक तप या कार्यक्रमाला पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमात वाढ करावी म्हणून मागील पाच वर्षापासून विविध क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या आणि पुढे नेणाऱ्या महानुभावांना पुरस्काराच्या रूपाने सन्मानित करण्याचा प्रयत्न मोरे पाटील परिवाराच्यावतीने केला जात आहे. कौटुंबिक स्वरूपात शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे हे १८ वे वर्ष असून पुरस्कार प्रदान करण्याचे ६ वे वर्ष असल्याचे देखील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
२०२० मध्ये आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारे हभप श्री बाळू महाराज गिरगावकर यांना तर २०२१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सहकारी कान्होजीराजे जेधे यांची वंशज श्री राजधिरजी जेधे आणि कान्होजी जेधे यांचा अप्रकाशित इतिहास उजेडात आणणारे सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ प्रा.डॉ. विलास सोनवणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे विभाग प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरवान्वीत करण्यात आले होते. २०२३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी वीर शिवा काशीद यांचे थेट वंशज श्री आनंदराव काशीद यांना तर मागील वर्षी २०२४ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजा तथा लेखिका डॉ. शितलताई मालुसरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशी माहिती देखील मोरे पाटील परिवाराच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
मोरे पाटील व शिवसृष्टी परिवाराच्या वतीने आयोजित या शिवजन्मोत्सव कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांना पुरस्कार वितरण, नवउद्योजकांचा सन्मान, रक्तदान शिबिर व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मोरे पाटील परिवार व शिवसृष्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Ramkisan Bodakhe