बेस्टच्या वरळी आगारातून सुटणाऱ्या बस क्र. ४४ व ५० या दोन बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची बीआरपीएसची आग्रही मागणी...

रजनीश कांबळे, मुंबई (९८६९३३९११६) - वरळीकर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बेस्टच्या वरळी आगारातून सुटणाऱ्या बस क्र. ४४ व ५० या दोन बसगाड्यांचे वेळापत्रक तात्काळ सुधारुन तसेच वारंवारता वाढवून, बस सेवा नियमित करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वरळी विधानसभेच्या वतीने वरळी आगार व्यवस्थापक यांना आज दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मागणीची वरळी आगाराचे व्यवस्थापक विजय पाटणे यांनी गंभीर दखल घेत लवकरच या बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे आश्वासन बीआरएसपीच्या शिष्टमंडळाला दिले.कोरोना लॉकडाऊनपूर्वी वरळी ते करीरोड या मार्गावर ४४, ५०, ६८, १६६ या क्रमांकाच्या बेस्ट बसगाड्या सेवारत होत्या. बेस्टच्या वरळी आगारातून सुटणाऱ्या उपरोक्त बसगाड्यांपैकी बस क्र. १६६ व बस क्र. ५० या सध्या रद्दबातल झाल्यामुळे, या मार्गावरील प्रवाशांना सद्यःस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, या मार्गावरील बसथांब्यांवर रद्द झालेल्या बसचा क्रमांक अद्याप दर्शवत असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचे बीआरएसपीचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष राम तंगारे यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणले.

सध्या सुरु असलेल्या बस क्र. ४४ व ५० या दोन्ही बसगाड्‌या वरळी ते लोअर परेल किंवा करीरोड रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या चाकरमानी तसेच विद्यार्थ्यांना सोयीच्या आहेत. या मार्गावरील बससेवा अपुरी व अनियमित असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, या मार्गावरील सर्व प्रवाशांना शेअर टॅक्सीने महागडा प्रवास करावा लागत आहे. बस क्र. ४४ ची वारंवारता कमी असून, दोन बसगाड्यांमधील वेळेमध्ये कमालीचे अंतर आहे. तशातच, ती बस आकाराने इतकी छोटी असते की, प्रवाशांना उभे राहण्यासदेखील जागा मिळत नाही. सद्यःस्थितीत या मार्गावर बसगाड्यांची संख्या मर्यादित व अपुरी असल्यामुळे प्रवाशांना दरवाजात लटकून जीवावर उदार होऊनच प्रवास करावा लागत असून, वरळीकरांच्या जिव्हाळ्याच्या सदर मागणीसंदर्भात विनाविलंब कार्यवाही न झाल्यास, बरळीकर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नाईलाजास्तव आंदोलन करणे भाग पडेल, असे बीआरएसपीचे वरळी विधानसभा महासचिव अमर जाधव यांनी या प्रसंगी आगार व्यवस्थापकांना सूचित केले.

या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळात वरळी विधानसभा महासचिव अमर जाधव, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष राम तंगारे, कार्यकारिणी सदस्य शरद गमरे यांचा समावेश होता.अमर मनोहर जाधव( महासचिव, वरळी विधानसभा)

रिपोर्टर

  • Siddharth Khandagale
    Siddharth Khandagale

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Siddharth Khandagale

संबंधित पोस्ट